समाजमाध्यमांचा उपयोग दहशतवादी गटांतर्फे त्यांचे दहशतवादी इरादे पूर्ण करण्याकरता युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी केला जात आहे. या माध्यमांचा अशारीतीने विनाशकारी उद्दिष्टांसाठी होऊ नये, म्हणून अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणाचे योग्य ते उपाय योजून या समाजमाध्यमांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, असे भारताने म्हटले आहे.
ज्या व्यासपीठांची निर्मिती लोकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आली, त्यांचा वापर ‘द्वेषाचा सतत प्रचार’ करण्यासाठी केला जात असल्याबद्दलही भारताने चिंता व्यक्त केली आहे. दहशतवादी गट समाजमाध्यमांचा वापर विनाशकारी परिणामांसाठी करत असल्याने त्यांच्यावर देखरेख ठेवणे गरजेचे झाले असल्याचे मत भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ‘दहशतवादाची हकीकत आणि विचारधारा यांचा प्रतिबंध’ या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना व्यक्त केले.
दहशतवादाचा राक्षस विकसित आणि विकसनशील देशांमध्ये सर्वत्र सारखाच पसरतो आहे आणि लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ज्यांची निर्मिती झाली अशा समाजमाध्यमांवर त्यासाठी तिरस्काराचा प्रचार केला जात आहे, असे भारतीय प्रतिनिधी म्हणाले.
दहशतवादाविरुद्धचा लढा म्हणजे कोणत्या धर्माविरुद्धचा लढा नाही
संयुक्त राष्ट्रसंघ- दहशतवादाविरुद्धचा लढा हा कोणत्याही धर्माविरुद्धचा लढा नसल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्पष्ट केले. दहशतवादामुळे जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे त्याचा मुकाबला जागतिक पातळीवरील सहकार्याने करण्याची गरज आहे, असेही भारताने म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धचा लढा कोणत्याही धर्माविरुद्धचा लढा नाही, हा मानवतावादाची मूल्ये आणि अमानवी शक्ती यांच्यातील संघर्ष आहे असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.