अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिखांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. या हल्ल्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारने भ्याड कृत्य असे या हल्ल्याचे वर्णन केले आहे. या हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भारत सरकार म्हटले आहे.

इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. “या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत आम्ही आमचा शोकभावना पोहोचवल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी कामना करतो. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे तयार आहे” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
“जगात करोना व्हायरसचे संकट असताना, अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक प्रार्थना स्थळावर हल्ला करण्याच्या भ्याड कृतीतून गुन्हेगारांची राक्षसी विचारसरणी दिसून येते” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

नेमकं काय घडलं ?
सकाळी पावणेआठच्या सुमारास एका व्यक्तीने गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांवर अंधाधुंद गोळीबार केला. शोर बाजार परिसरातील गुरुद्वारावर झालेल्या या हल्ल्याच्यावेळी तेथे दीडशे लोकं उपस्थित होती असं प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. मागील काही काळांमध्ये अफगाणिस्तानमधील शीख समुदायावर झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे.