७५ दिवसांनंतर नीचांकी रुग्णवाढ

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णवाढीत ८५ टक्के घट झाली आहे. शिखर काळात सुमारे चार लाख प्रतिदिन होणारी रुग्णवाढ गेल्या चोवीस तासांमध्ये ६० हजार ७४१ पर्यंत खाली आली असून ही नीचांकी दैनंदिन रुग्णवाढ तब्बल ७५ दिवसांनंतर नोंदवण्यात आल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

विविध राज्ये टाळेबंदीसदृश्य निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करत आहेत. पाच टक्कय़ांपेक्षा कमी संसर्गदर असलेल्या जिल्ह्यांना शिथिलीकरणात प्राधान्य दिले जात आहे. प्रतिदिन १०० पेक्षा जास्त रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांची संख्याही कमी होऊ लागली असून ती ५३१ वरून १६५ जिल्ह्यांवर आलेली आहे. सलग आठ दिवस दैनंदिन रुग्णवाढ एक लाखांपेक्षाही कमी झाली. २० राज्यांमध्ये ५ हजारांपेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत. गेल्या पाच आठवडय़ांमध्ये सरासरी संसर्गदर ४.८ टक्के राहिला असून त्यात शिखर काळापेक्षा ७८ टक्कय़ांनी घसरण नोंदवली गेली. गेल्या चोवीस तासांमध्ये संसर्गदर ३.४ टक्के होता.

या आकडेवारीवरून देशभरात करोनाची लाट आटोक्यात आली असल्याचे दिसते. मात्र, विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याची दक्षता स्थानिक पातळीवर अधिक घ्यावी लागेल. तुलनेत जिथे जास्त प्रादूर्भाव असेल, तिथे छोटे-छोटे प्रतिबंधित क्षेत्र तयार करावी लागतील व शोधमोहीम, नमुना चाचण्या आणि विलगीकरणावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, अशी सूचना करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्हे. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

अमेरिकेतील ‘नोव्हाव्हॅक्स’ लसही नजिकच्या भविष्यात देशात उपलब्ध होईल व त्याचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर केले जाईल, अशी माहिती डॉ. पॉल यांनी दिली. पुण्यातील सीरम कंपनी ‘नोव्हाव्हॅक्स’चे उत्पादन करणार असून त्यासाठी अमेरिकेतील उत्पादक कंपनीशी अंतिम टप्प्यातील बोलणी केली  जात आहेत. या लशीची लहान मुलांवरही चाचणी घेतली जात असून ती यशस्वी झाल्यास भारतालाही त्याचा फायदा होऊ  शकेल, असे पॉल म्हणाले.

तरुणांना अधिक लागण झाल्याचा दावा चुकीचा

दुसऱ्या लाटेत तरुण व लहान मुलांना तुलनेत अधिक संसर्ग झाल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला आहे. पहिल्या लाटेत ११-२० वयोगटातील ८.०३ टक्के मुलांना करोनाचा संसर्ग झाला होता, दुसऱ्या लाटेत या वयोगटातील बाधितांची संख्या ८.५७ टक्के होती. पहिल्या लाटेत २१-३०, ३१-४० अणि ४१-५० या वयोगटांत अनुक्रमे  २१.२१ टक्के, २१.२३ टक्के व १७.३० टक्के लोकांना संसर्ग झाला. दुसऱ्या लाटेत या वयोगटांत अनुक्रमे २२.४९ टक्के, २२.७० टक्के आणि १७.२६ टक्के लोकांना करोनाची बाधा झाली, अशी आकडेवारी केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.