भारतात करोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात मागील २४ तासांमध्ये ८२ हजार ३७६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णांची संख्या ५० लाख ९ हजार २९० इतकी झाली आहे. तर भारतात करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ८२ हजार ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात ९ लाख ९३ हजार ७९० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत ३९ लाख ३३ हजार ४५५ रुग्ण देशात करोनामुक्त झाले आहेत. http://www.worldometers.info/coronavirus/ या वेबसाईटने ही आकडेवारी दिली आहे. दरम्यान मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात २० हजार ४३२ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

भारतात करोनाग्रस्तांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला असला तरीही समाधानाची बाब ही आहे की आत्तापर्यंत ३९ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातील १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात करोनाग्रस्तांच्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५ हजार ते ५० हजारांच्या दरम्यान आहे. फक्त चार राज्ये अशी आहेत जिथे अॅक्टिव्ह केसेस ५० हजारांपेक्षा जास्त आहे. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आज समोर आलेल्या संख्येनुसार २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. भारतात सोमवारी रात्री पर्यंत करोनाच्या एकूण ४९ लाख २६ हजारांपेक्षा जास्त केसेस होत्या. त्यामध्ये नव्या रुग्णांची भर पडल्याने भारताने ५० लाख संख्येचा टप्पा ओलांडला आहे.

जगाच्या तुलनेत भारतात करोना संसर्गाचा वेग मंदावला आहे असं वक्तव्य भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत केलं होतं. करोनाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तातडीने जी पावलं उचलली त्याचा हा परिणाम आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. देशात करोना बाधितांची संख्या दररोज वाढते आहे. करोना लशीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत फास्ट ट्रॅक व्हॅक्सिन आणण्याचा विचार सुरु आहे असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं.