जगभरात तसंच देशातही करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत देशातही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रविवारी देशात करोनाबाधितांच्या संख्येनं १४ लाखांचा टप्पा ओलांडला. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार देशात करोनाग्रस्तांची संख्या आता १४ लाख ११ हजार ९५४ वर पोहोचली आहे. covid19india.org ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ९ लाख १ हजार ९५९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत करोनामुळे ३२ हजार ३५० जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

देशात करोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात रविवारी ६ हजार ४४ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. तर दुसरीकडे रविवारी राज्यात ९ हजार ४३१ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दरही ५६.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात मृत्यूदर ३.६३ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार २९६ रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ७५ हजार ७९९ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

तामिळनाडूत नवे ६,९०० हजार रुग्ण

तामिळनाडूत रविवारी नव्या ६ हजार ९८६ रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील करोनाबाधितांची संख्या २ लाख १३ हजार ७२३ वर पोहोचली आहे. तमिनाडूमध्ये करोनामुळे आतापर्यंत ३ हजार ४९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात ५३ हजार ७०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १ लाख ५६ हजार ५२६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

दिल्लीतील रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्क्यांवर

दिल्लीत आतापर्यंत १ लाख ३० हजार ६०६ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच सद्यस्थितीत दिल्लीत ११ हजार ९०४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. दिल्लीत करोनामुळे ३ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीतील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे मध्यप्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये ७१६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर मध्यप्रदेशातील करोनाबाधितांची संख्या २६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. तेलंगणमध्येही गेल्या २४ तासांमध्ये नवे १ हजार ५९३ नवे रुग्ण सापडले. तेलंगणमधील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५४ हजार ०५९ वर पोहोचली आहे.