नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९५ लाखांचा आकडा ओलांडला आहे तर करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८९.७३ लाखांवर गेली आहे. त्यामुळे करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४.११ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३५ हजार ५५१ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची संख्या ९५ लाख ३४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ५२६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ३८ हजार ६४८ इतकी झाली आहे.

करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८९ लाख ७३ हजार ३७३ वर गेली असून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९४.११ टक्क्यांवर गेले आहे तर मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के इतके झाले आहे. देशात सध्या चार लाख २२ हजार ९४३ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या ४.४४ टक्के इतके आहे.

पत्रकारांचा ‘कोविड योद्धा’त समावेश करा..

कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या पत्रकारांचाही डॉक्टर आणि इतर आवश्यक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘कोविड योद्धा’ श्रेणीत समावेश करावा आणि त्यांना तसेच लाभ द्यावेत, अशी मागणी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने केंद्र सरकारकडे केली आहे.

हरियाणा सरकारने यापूर्वीच आणलेल्या योजनांच्या धर्तीवर पत्रकारांसाठी गट विमा योजना तयार करून तिची अंमलबजावणी करावी, असेही आवाहन केंद्रासह सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात संघटनेने केले आहे.

याबाबतचा ठराव इतर पत्रकार संघटनांशी समन्वयाने प्रेस कौन्सिलने केला आहे. या ठरावानुसार प्रेस कौन्सिलने माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्रे पाठवली आहेत.