देशभरात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये ८६ हजार ९६१ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ८७ हजारांच्या पुढे पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५४ लाख ८७ हजार ५८१ करोनाबाधितांमध्ये १० लाख ३ हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४३ लाख ९६ हजार ३९९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८७ हजार ८८२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

२० सप्टेंबरपर्यंत ६,४३,९२,५९४ नमूने तपासण्यात आले आहेत. यापैकी ७ लाख ३१ हजार ५३४ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असला, तरी देखील एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यावरून देशात दिवसागणिक करोनावर मात केलेल्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

जगभरातील करोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी १९ टक्के संख्या ही भारताची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.