जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोना महामारीचा प्रादुर्भाव भारतात वाढतच चालाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४,००,०४४ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १० हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८६ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. देशातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्केंच्या जवळ पोहचलं आहे. देशात आतापर्यंत ४३ लाख ३ हजार ४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोना चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी ३६ लाख ६१ हजार ६० करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


शनिवारी १२ लाख ६ हजार ८०६ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.