लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.

देशात मागील काही आठवड्यांपासून ७० हजार ते ८० हजारांच्या सरासरीनं दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानं हा दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात करोनाची स्थिती आणखी बिकट होत असल्याचेच आकडेवारीतून दिसून आलं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्येत काहीशी घट होत असल्याचं दिसून येत असतानाच अखेरच्या आठवड्यात मात्र संसर्गाचा प्रमाण वाढल्यानं चितेत भर पडली आहे. मागील पाच दिवसांमध्ये दिवसाला ७६,००० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या आठवड्यात संसर्ग होण्याचं प्रमाण १३.१ टक्के वाढलं आहे. हे प्रमाण मागील आठवड्यातील संसर्गाच्या तुलनेत ४.७ टक्क्यांनी अधिक आहे.

मृत्यूंची आकडेवारीही चिंताजनक

दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही चिंता करायला लावणारा आहे. देशात मागील सलग चार दिवसात १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील मृत्यूदर ३.९ टक्के इतका होता. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत हा मृत्यूदर दुप्पट झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्या आधीच्या आठवड्यात देशातील मृत्यूदर १.७ टक्के इतका होता.