नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील चीनशी संघर्षांनंतर भारतीय नौदलाने हिंदी महासागरात मोठय़ा प्रमाणात युद्धनौका व पाणबुडय़ा तैनात केल्या आहेत. संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातून चीनला कठोर संदेश देण्यात आला .

१५ जून रोजी गलवान येथे चिनी लष्कराने केलेल्या हिंसाचारात भारताचे २० सैनिक शहीद झाले होते, त्यात चीनचेही ३५-४० सैनिक मारले गेल्याचे अमेरिकी गुप्तचरांनी सांगितले होते पण चीनने हा आकडा कधीच उघड केला नाही. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर, हवाई दल व नौदल या तीन पातळ्यांवर सरकारने चीनविरोधात आघाडी उघडली असून त्याच्या जोडीला राजनैतिक व आर्थिक मार्गाचा वापर केला जात आहे.

चीनने पूर्व लडाखमध्ये केलेले दु:साहस मान्य नसल्याचे यातून भारताने दाखवून दिले आहे. तीनही सेना दलांच्या प्रमुखांमध्ये रोजच्या रोज संपर्क असून चीनचा मुकाबला करण्यासाठी स्पष्ट संदेश जातील अशा कृती केल्या जात आहेत.

भारताच्या कृतीवर चीनने प्रतिसाद दिला आहे काय, यावर सूत्रांनी सांगितले,की हिंदी महासागरात चीनची तैनाती वाढलेली नाही. त्यांच्या युद्धनौका व जहाजे होती तेवढीच आहेत. दक्षिण चीन सागरात चीनने मोठय़ा प्रमाणात तैनाती केल्यामुळे हिंदी महासागरात त्यांनी प्रतिसाद दिला नसण्याची शक्यता आहे.

चीनच्या विस्तारवादी भूमिकेला अमेरिकेचा विरोध असून दक्षिण चीन सागरातील चीनच्या कारस्थानांना अमेरिकेसह अनेक देशांनी विरोध केला आहे. अमेरिकेने सध्या दक्षिण चीन सागरात युद्धनौका तैनात केल्या असून आता भारतानेही हिंदी महासागरात तसाच पवित्रा घेत, अमेरिकी नौदल, जपानी स्वसंरक्षण दल यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे.

भारताने अलीकडेच फ्रान्स, अमेरिका, जपान यांच्या नौदलांबरोबर हिंदी महासागरात संयुक्त कवायती केल्या होत्या, त्यातूनही चीनला संदेश देण्यात आला होता. या कवायतीत अमेरिकेची युएसएस निमित्झ युद्धनौका सामील होती. भारत,जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांचा ‘क्वाड’ गट तयार करण्यात आला असून तो चीनच्या विरोधात आहे.