आपल्या इच्छेविरुद्ध इबोला रुग्णांवर उपचार करण्याची सक्ती करण्यात आलेल्या नायजेरियातील चारही भारतीय डॉक्टरांच्या तसेच संबंधित रुग्णालयांच्या संपर्कात असल्याचे तेथील भारतीय उच्चायुक्तालयाने स्पष्ट केले आणि लवकरच यातून सर्वमान्य तोडगा निघू शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आपली पारपत्रे जप्त करण्यात आली असून आपला येथील निवास वाढविण्याची धमकी रुग्णालय प्रशासन देत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. आणि भारतीय उच्चायुक्तालयाने आपली येथून लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती डॉक्टरांनी केली. नायजेरियाची राजधानी अबुजा येथील प्रायमस रुग्णालयाच्या प्रशासनाने मात्र त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. उच्चायुक्तालय सध्या डॉक्टर आणि प्रशासन अशा दोहोंच्याही संपर्कात असून लवकरच सन्मान्य तोडगा निघेल अशी आशा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्त्याने व्यक्त केली. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आलेल्या इबोला या रोगाने सध्या नायजेरियात थैमान घातले असून त्यामुळे यंदा १०१३ रुग्ण दगावले आहेत. या रोगावर सध्या कोणतेही थेट औषध किंवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सध्या आरोग्यविषयक आणिबाणीची परिस्थिती ओढवली असल्याचे जाहीर केले आहे. तर रुग्णांवर औषधांचे प्रयोग करायचे झाल्यास नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, स्पेनमधील एका धर्मोपदेशकाचा इबोला आजारामुळे मृत्यू झाला असून हा युरोपातील पहिला इबोला बळी आहे.