कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत भारताने चिता व्यक्त केली आहे. दरम्यान, ओपेकमधील प्रमुख देश सौदी अरेबियाशीही भारताने तेलाच्या वाढत्या किंमतींना नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याची विनंती केली आहे. गुरूवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. जानेवारी महिन्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यासंदर्भात शुक्रवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाच्या पेट्रोलिअम मंत्र्यांशी चर्चा केली.

ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत सध्या 65 डॉलर्स प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेच्या नौदलाचे ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणला याचा परिणाम भोगावा लागणार असल्याचे सांगितले होते. याचा परिणामही कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचे म्हटले जात आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीवर पेट्रोलिअम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाचे पेट्रोलिअम मंत्री खालिद अल फलीह यांच्याशी संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. तसेच इराण अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार होत असल्याने भारतीय ग्राहकांच्या संवेदनशीलतेचा उल्लेख केला.

दरम्यान, सौदी अरेबियाचे खालिद अल फलीह यांच्याशी फोनवर चर्चा झाली. भारत आणि सौदी अरेबियादरम्यान सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाची हायड्रोकार्बन क्षेत्रात सहयोग आणि सहकार्य वाढवण्यावरही चर्चा करण्यात आली असल्याची माहितीही प्रधान यांनी दिली.