दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या ‘सार्क’ परिषदेतसाठी हजर राहिलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तान वगळता अन्य सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले नाही किंवा एकमेकांकडे पाहिलेही नाही. दोन्ही देशांत वाढलेल्या अंतराला भारत जबाबदार असून आता चर्चेची सुरुवात भारताकडूनच व्हावी, अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आहे.
‘सार्क’ परिषदेच्या व्यासपीठावर  शरीफ व मोदी यांच्यात दोन आसनांचे अंतर होते. मालदीव व नेपाळचे dv01राष्ट्रप्रमुख या दोनही नेत्यांच्या मध्ये बसले होते. भाषण करण्यासाठी शरीफ ज्या वेळी मोदी यांच्या समोरून गेले, त्या वेळी त्यांनी मोदी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तर मोदींनीही शरीफ यांना महत्त्व दिले नाही.
दोन्ही देशातील अबोल्याची जबाबदारी पाकिस्तानने भारतावर ढकलली. ‘नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांत रचनात्मक चर्चा होण्याची शक्यता दिसत नाही. पाकिस्तान चर्चेला तयार आहे. मात्र, त्यासाठी भारतानेच पुढाकार घ्यायला हवा. कारण त्यांनीच परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा थांबवली होती,’ असे शरीफ यांचे परराष्ट्र व राष्ट्रीय सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटले. तर ‘त्यांची विनंती न आल्याने चर्चा झाली नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र, तसे वातावरण तयार व्हायला हवे,’ असे भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले. दरम्यान, दहशतवाद हे भारतीय उपखंडासमोरील सर्वात मोठे आव्हान असून, या आव्हानास तोंड देण्यासाठी सार्क सदस्य राष्ट्रांनी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बुधवारी भारताने व्यक्त केली होती.
मनातील वेदनांना अंत नाही
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास बुधवारी सहा वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य नेत्यांनी, या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यात १६६ निष्पाप ठार झाले त्याबद्दल भारतीयांच्या मनात अद्यापही वेदना असून त्यांना अन्त नाही, असे नेत्यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याचा एक खटला अद्याप पाकिस्तानात सुरू असून खटल्याच्या सुनावणीस विलंब होत असल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरात लवकर कडक शासन करावे, अशी मागणी भारताने केली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा मुकाबला करताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या दिलेर अधिकाऱ्यांना मुंबईत श्रद्धांजली वाहिली. अशा प्रकारच्या हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कितपत तयारी झाली आहे याचा आढावा सुरक्षारक्षकांनी घेतला.