डोक्लाममध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. या काळात चीनकडून वारंवार भारताला १९६२ ची आठवण करुन दिली जाते आहे. भारताला १९६२ सारखा धडा शिकवू, अशी धमकी चीनकडून वारंवार दिली जाते आहे. मात्र भारतीय सैन्याकडून तयार करण्यात आलेल्या एका अहवालानुसार या भागात भारतीय हवाई दलाची स्थिती चीनपेक्षा जास्त मजबूत आहे. ‘द ड्रॅगन क्लॉज : असेसिंग चीन पीएलएएएफ टुडे’ या नावाने भारतीय सैन्याकडून एक दस्तावेज तयार करण्यात आला आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

डोक्लाममध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाकडून एक अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय हवाई दल आणि चिनी हवाई दलाच्या क्षमतेची तुलना करण्यात आली आहे. दोन्ही हवाई दलांच्या युद्धसज्जतेचा अभ्यास करुन भारतीय हवाई दलाकडून अहवाल तयार करण्यात आला. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्क्वाड्रन लीडर समीर जोशी यांनी दोन्ही हवाई दलांच्या सज्जतेचा आढावा घेणारा अहवाल तयार केला आहे. जोशी भारतीय हवाई दलात मिराज २००० या विमानाचे वैमानिक म्हणून कार्यरत होते.

समीर जोशी यांनी केलेल्या तुलनात्मक अभ्यासातून काही प्रमुख गोष्टी प्रथमच उजेडात आल्या आहेत. तिबेट आणि दक्षिण शिनजियांग भागात भारताची क्षमता चीनपेक्षा अधिक असल्याचे जोशी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. ‘तिबेट आणि दक्षिण शिनजियांग प्रांतात भारतीय हवाई दल भौगोलिक, तांत्रिक आणि प्रशिक्षण या तिन्ही दृष्टीने चिनी हवाई दलावर भारी पडू शकते. या भागात भारताची स्थिती चीनपेक्षा चांगली आहे,’ असे जोशी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

‘चिनी सैन्याचा मुख्य हवाई तळ उंचीवर असल्याने त्यांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता येणार नाही. त्यामुळे चीनच्या एसयू-२७, जे-११ आणि जे-१० या लढाऊ विमानांना तिबेटस्थित हवाई दलाच्या तळांवरुन पूर्ण ताकदीने लढाईत उतरता येणार नाही. दुसरीकडे भारतीय हवाई दलाचे तळ तेजपूर, कलाईकुंड, चाबुआ आणि हासिमस भागात आहेत. या प्रदेशांमधील भौगोलिक स्थिती लक्षात घेता भारतीय हवाई दल पूर्ण क्षमतेने लढाईत उतरु शकेल. यामुळे भारतीय हवाई दल तिबेटमध्ये खोलवर घुसून अतिशय प्रभावीपणे हल्ला चढवू शकते,’ असे समीर जोशी यांनी दोन्ही हवाई दलांचा आढावा घेऊन तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.