जागतिक आपत्ती असल्याचे चान्सलर अँगेला मर्केल यांचे मत

एक्स्प्रेस वृत्तसेवा नवी दिल्ली : दहशतवाद ही जागतिक आपत्ती आहे, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवाव्या आणि आपल्या देशाच्या भूमीचा वापर अन्य देशांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी होणार नाही याची सर्व देशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारत आणि जर्मनीने शुक्रवारी संयुक्तपणे केले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जर्मनी भारतासमवेत आहे, काश्मीरबाबत मोदी यांचे म्हणणे आपण प्रथम ऐकून घेणार आहोत, असे जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल म्हणाल्या.

मर्केल भारत दौऱ्यावर आल्या असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. मोदी यांच्यासमवेत आणखी एकदा चर्चा होणार असून त्या वेळी आपण त्यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे मर्केल यांनी जर्मनीच्या माध्यम प्रतिनिधींना स्वतंत्रपणे सांगितले.

दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे, असे मोदी म्हणाले. काश्मीर प्रश्नावर मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत, भारताची भूमिका आम्हाला माहिती आहे, परंतु प्रथम आपल्याला मोदी यांचे म्हणणे ऐकून घ्यावयाचे आहे, सध्याची स्थिती चांगली नाही, त्यामध्ये बदल करावाच लागेल, असे मर्केल म्हणाल्या.

भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जर्मनी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे जर्मनीने भारताकडे स्पष्ट केल्याचे शुक्रवारी सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

११ करारांवर स्वाक्षऱ्या

भारत व जर्मनी यांनी द्विपक्षीय व बहुपक्षीय सहकार्य वाढवून दहशतवादाचा मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्याशी चर्चेनंतर दिली. दोन्ही नेत्यांनी पाचव्या आंतरसरकारी सल्लामसलत परिषदेत सहभागावेळी एकूण ११ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून एकूण पाच संयुक्त जाहीरनाम्यांना मंजुरी दिली आहे.