न्यूयार्क :  भारताने संयुक्त राष्ट्रांना पन्नास किलोव्ॉटच्या गांधी सोलर पार्कची भेट देण्याचे ठरवले असून या त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवेळी होणार आहे. हवामान बदलाबाबत केवळ बोलघेवडेपणा न  करता प्रत्यक्ष कृती करण्याची भारताची मानसिकता यातून अधोरेखित होत आहे.

भारत १० लाख डॉलर्स किमतीच्या सौर पट्टिका संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर लावण्यासाठी देणार आहे. यात प्रत्येक देशासाठी एक या प्रमाणे १९३ सौर पट्टय़ा असून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने मोदी हे २४ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील गांधी सोलर पार्क व गांधी पीस गार्डनचे उद्घाटन दूरनियंत्रण पद्धतीने करणार आहेत.

गांधी पीस  गार्डन हा भारताच्या न्यूयॉर्कमधील महावाणिज्य दूतावासाचा उपक्रम असून त्यात दीडशे झाडे लावण्यात आली आहेत. या प्रकल्पास शांती फंड व दी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांनी मदत दिली आहे. हे स्मृती उद्यान गांधींच्या स्मृतीला समर्पित केले जाईल. काही लोक त्यांच्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी यातील झाडे दत्तक घेणार आहेत. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या आवारात या स्मृती उद्यानाची निर्मिती ६०० एकर जागेत केली आहे. भारताचे स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले,की संयुक्त राष्ट्रांत  भारताने असे प्रतीकात्मक प्रयत्न यापूर्वी कधी केले नव्हते. यातून प्रत्येक देशावर प्रभाव पडणार आहे. संयुक्त राष्ट्रांतील गांधी सोलर पार्कमध्ये  ५० किलोवॉट वीज निर्मिती होणार आहे.  तीस हजार किलो कोळसा जाळून जेवढी वीज निर्मिती होते तेवढी यात होणार आहे.

मोदी विविध नेत्यांशी संपर्क साधणार

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे ७४ वे अधिवेशन पुढील आठवडय़ात सुरू होत असून त्यानिमित्ताने भारताने विविध देशांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी जय्यत तयारी केली असून  पंतप्रधान मोदी यांच्या सहभागामुळे कृतिनिष्ठ फलश्रुतीची अपेक्षा आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांनी व्यक्त केले.   ते म्हणाले,की संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनासाठी ७५ देशांचे प्रमुख व परराष्ट्र मंत्री येणार असून त्या वेळी पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंक र, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे विविध मंचांवर विविध देशांच्या नेत्यांशी संपर्क साधणार आहेत.