पाकव्याप्त काश्मीरमधील चीनच्या वाढत्या हालचालींची दखल घेण्यात असून  चीनने या हालचाली थांबवाव्यात अशी मागणी सरकारकडून करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. आज लोकसभेत सादर केलेल्या लेखी निवेदनात पर्रिकरांनी याबद्दलची माहिती दिली. काश्मीरच्या गिलगिट- बाल्टिस्टान या पाकव्याप्त भागात गेल्या काही दिवसांत चीनचा वावर वाढला आहे. ही बाब आमच्या ध्यानात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. याविषयी भारताकडून चीनकडे चिंता व्यक्त करण्यात आली असून या हालचाली थांबवाव्यात, अशी मागणी आम्ही चीनकडे केल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. भारतीय सागरी हद्दीतही चीनची जहाजे आणि पाणबुड्यांचा वावर वाढला आहे. याशिवाय, २००९ पासून या सागरी हद्दीतील चाचेगिरी रोखण्यासाठी चीनकडून एडनच्या आखातात अनेक जहाजे आणि पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत या भागात चीनकडून साधारण २० जहाजे आणि पाणबुड्या पाठविल्याचा आमचा अंदाज असल्याची माहिती पर्रिकरांनी आपल्या निवेदनाद्वारे लोकसभेत दिली.