पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; दुराग्रह सोडण्याचे आवाहन
दहशतवाद आणि तापमानवाढ या जगातील सर्वात मोठय़ा समस्या बनल्या असून, प्राचीन भारतीय संस्कृती आधुनिक काळातील अनेक समस्या सोडविण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘विचार महाकुंभ’ कार्यक्रमाच्या समारोपात केले.
जगभरात एका बाजूला दहशतवाद फोफावला असताना दुसऱ्या बाजूला जागतिक तापमानवाढीने घेरले आहे. ‘आमचा मार्ग तुमच्यापेक्षा सरस आहे’ ही दुराग्रही वृत्ती संघर्षांला कारणीभूत ठरली आहे. यामुळे ही वृत्ती सोडली की समस्या दूर होण्यास मदत होईल, असे सिंहस्थ कुंभानिमित्त ‘लिव्हिंग दि राईट वे’ या विषयावर झालेल्या तीन दिवसांच्या आंतराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी मोदी यांनी सांगितले.
जगाला सध्या संघर्ष व्यवस्थापनाची समस्याही भेडसावू लागली आहे. आम्हा भारतीयांना संघर्ष व्यवस्थापनाचा वारसा प्राचीन संस्कृतीतून मिळाला आहे. जग जे आज करत आहे त्याचे भारतीय कित्येक युगांपासून पालन करत आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी आपला मुद्दा अधोरेखित करण्यासाठी पौराणिक कथांचे दाखले दिले.
वडिलांची आज्ञा पाळणारा राम आणि वडिलांच्या चुकीच्या आदेशाचे उल्लंघन करणारा प्रल्हाद, तसेच सीता आणि मीरा यांचीही पूजा करणारी आपली संस्कृती आहे. क्षमता आणि संस्कृती यांचा मिलाफ झाल्यास समस्यांचे निराकरण करणे सोपे होते, असे मोदी यांनी सांगितले.
याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह ५१ कलमी ‘सिंहस्थ घोषणापत्र’ जारी केले.