केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची अपेक्षा

जगातील अनेक प्रगत देशांच्या आर्थिक स्थितीत होणाऱ्या चढउतारांचे फटके भारतीय व इतर बाजारपेठांना बसत असून त्या देशांच्या अर्थव्यवस्थांनी त्यांच्या धोरणाचे परिणाम इतरांवर होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी साधनांची जुळवाजुळव आतापासून केली पाहिजे. कारण वेळोवेळी आर्थिक पेचप्रसंग निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय पत व आर्थिक समितीच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की भारतात स्थूल आर्थिक स्थिती समतोल व मजबूत आहे. वाढीच्या शक्यतेने आमचा देश जगाच्या पाठीवर आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून चमकदार कामगिरी करीत आहे. २०१५-१६ या वर्षांत आर्थिक विकासाचा दर ७.६ राहिला, त्या आधीच्या वर्षांत तो ७.२ टक्के होता. आर्थिक वाढीतील कामगिरी आश्वासक असून लागोपाठ दोन वर्षे मान्सूनच्या पावसाने दगा देऊनही ही वाढ झालेली आहे. निर्यात वृद्धीत चिंतेचे वातावण आहे, निर्यात ही जागतिक मागणी कमी असल्याने घटली आहे. जागतिक पातळीवर प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशात उत्पादकता कमी आहे व आर्थिक वाढही उतरणीला आहे. त्यामुळे त्याचा फटका उदयोन्मुख बाजारपेठांना बसत असून त्यांना अस्थिरतेचा धोका आहे. त्या देशांमध्ये वस्तूंच्या किमतीत घसरण, व्यापारात घट, कार्यक्षमतेचा पुरेसा वापर नसणे व आर्थिक घटक कमकुवत असणे यामुळे शाश्वत आर्थिक विकासाला फटका बसत आहे. जगात कमी उत्पन्न असलेल्या देशांना बहुसंस्थात्मक अशा आर्थिक पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांची प्रगती खुंटणार नाही. नाणेनिधीने त्यांच्या रचनेत व कारभारात सुधारणा राबवणे गरजेचे आहे शिवाय आर्थिक साधने उपलब्ध करण्यातही जबाबदारी घेतली पाहिजे.