शस्त्रखरेदीबाबत भारताकडून स्वतंत्र धोरणाचा अवलंब केला जातो, असे वक्तव्य लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले.

अमेरिकेने रशियावर र्निबध लादलेले असतानाही भारताने रशियासोबत एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा करार केला. त्यामुळे भारतावरही अमेरिकी कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही रशियाकडून कामोव्ह बनावटीची हेलिकॉप्टरही घेण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्या पाश्र्वभूमीवर रावत यांनी जनरल के. व्ही कृष्णराव स्मृती व्याख्यानात हे विधान केले. भारत रशियाकडून कामोव्ह केए-२२६टी या प्रकारची २०० हेलिकॉप्टर घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलाकडे केए-२५ ही रशियन हेलिकॉप्टर अनेक वर्षांपासून आहेत.

जनरल रावत नुकतेच रशिया दौऱ्यावरून परतले आहेत. तेथे त्यांनी रशियाच्या सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन्ही देशांतील संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर चर्चा केली. तेथे रशियाच्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख रावत यांनी भाषणात केला. भारताचे धोरण सध्या अमेरिकेकडे झुकत आहे. अमेरिकेने रशियावर र्निबध लादले असून रशियाशी व्यापार केला तर अमेरिकेकडून भारतावरही र्निबध लादले जाऊ शकतात. असे असतानाही भारत रशियाकडून शस्त्रखरेदी करत आहे. या संदर्भात भारताची नेमकी भूमिका काय, असे त्या रशियन अधिकाऱ्याने रावत यांना विचारले होते. त्याला दिलेल्या उत्तराचाही रावत यांनी व्याख्यानात उल्लेख केला.

जेव्हा भारत अमेरिकेकडून तंत्रज्ञान विकत घेतो तेव्हा रशियाने निश्चिंत राहण्यास हरकत नाही. भारत संरक्षण खरेदीबाबतीत स्वतंत्र धोरणाचा अवलंब करतो. आज येथे आपण अमेरिकी र्निबधांविषयी बोलत असलो आणि रशिया र्निबधावर प्रश्न उपस्थित करत असला तरी त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारतात एस-४०० करारावर स्वाक्षऱ्या करत आहेत. त्यातून भारतावरही र्निबध येण्याची शक्यता असली तरी हा करार होत आहे, असे रावत यांनी रशियन अधिकाऱ्याला उत्तर दिले.

भारतीचे लष्कर प्रबळ आहे आणि देशासाठी जे योग्य आहे त्यासाठी सर्व बळानीशी उभे राहण्याची आमची तयारी आहे. हे रशियालाही माहीत असल्याने रशियन सेनादले भारताशी अधिक संबंध वाढवण्यात उत्सुक आहेत, असेही रावत म्हणाले.