News Flash

भारताकडून प्रेरणा घेत ऑस्ट्रेलियाही नोटाबंदीच्या विचारात

भारताकडून शिकता येईल असे ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्तांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्त हरिंदर सिध्दू

भारतात नोटाबंदीवरुन अजूनही गदारोळ सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीचेही या नोटाबंदीकडे लक्ष आहे. भारताकडून प्रेरणा घेत ऑस्ट्रेलियाही नोटाबंदीचा निर्णय घेऊ शकेल असे संकेत ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्त हरिंदर सिद्धू  यांनी दिले आहेत. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाल्यास भारतात मोठा बदल घडेल असे त्यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. यामध्ये सिद्धू यांनी भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही भाष्य केले. हरिंदर म्हणाल्या, नोटाबंदीच्या निर्णयाकडे आमचेही लक्ष आहे. सरकारने हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. सरकार ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे ते बघून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने काळा पैशाविरोधात घेतलेल्या या निर्णयातून ऑस्ट्रेलियालाही प्रेरणा मिळाली आहे. तिथेही नोटाबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले. आम्ही काही दिवसांपूर्वी काळा पैशाविरोधात टास्क फोर्सची स्थापना केली होती. आता ऑस्ट्रेलियातही अधिक मुल्यांचे चलन बाद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील नोटाबंदीच्या प्रक्रियेकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. यातून आम्हालाही काही शिकता येईल असे त्यांनी नमूद केले.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील व्यापारी संबंधामध्ये वाढ होत असल्याचे हरिंदर सिद्धू यांनी सांगितले. २००४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात ५०० ते ६०० मिलियन डॉलर्सचा व्यापार होत होता. आता हेच प्रमाण थेट २० बिलियन डॉलरवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.  भारतासोबतचे आर्थिक संबंध वाढवण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.  अरुण जेटली यांनी मार्चमध्ये उद्योजकांच्या शिष्टमंडळासह भेट दिली होती. पुढच्या वर्षी आम्ही भारतात ऑस्ट्रेलियातील उद्योजकांचे शिष्टमंडळ आणू. तसेच भारतासोबत संरक्षण विषयक झालेले करार हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्यात.

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्यांवरही त्यांनी उत्तर दिले. भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात सुरक्षित देश आहे. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये २० टक्के भारतीय असून भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांचे प्रमाणही १० वर्षात तिप्पट वाढल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी गुन्हेगारी हेतून झालेले हल्ले हे वर्णभेदी हल्ले म्हणून सांगितले जातात. पण अशा हल्ल्यांमध्ये वर्णभेद कारण नसते. दिल्लीप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्येही रात्रीच्या वेळी फिरताना पर्यटकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलियात साम्य आहे. दोन्ही देशांना हिंद महासागर लाभला आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये लोकशाही असून खंडात कायद्याचे राज्य असावे अशी दोन्ही देशांची मानसिकता असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 10:06 am

Web Title: india has inspired australia to act on black money may demonetise australian envoy
Next Stories
1 सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल
2 काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
3 मालकीच्या वादात ‘सायकल’ रुतली!
Just Now!
X