नवी दिल्ली : करोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याची टक्केवारी ही अमेरिका, इटली, स्पेन आणि ब्रिटन या विकसित देशांसह इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असून करोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात तफावत असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालय, वल्डरेमीटर ही जागतिक अधिकृत आकडेवारी असणारी वेबसाइट यांचा हवाला घेऊन ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारतात ५०० रुग्ण संख्येवरून १०००  होण्यास पाच दिवसांचा कालावधी लागला. तर २००० होण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला. ४ हजार रुग्ण होण्यासाठी तीन दिवस लागले मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे ८ हजार करोनाबधित होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला होता. १६ हजार रुग्ण होण्यासाठी आठ दिवस तर ३२ हजार रुग्ण संख्या होण्यासाठी १० दिवस लागले होते.

त्या तुलनेत अमेरिकेत ५०० वरून १००० रुग्णसंख्या होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला होता. तर ८ हजारांपर्यंत रुग्ण दुप्पट होण्यासाठी तीन दिवस लागले. मात्र त्यानंतर दर दोन दिवसांआड रुग्णसंख्या दुप्पट होत गेली.

इटलीमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी प्रथम दोन, मग तीन आणि चार दिवस लागले होते. स्पेन आणि ब्रिटनमध्ये जवळपास याच फरकाने रुग्णसंख्या दुप्पट होत होती.

कॅनडातील रुग्णसंख्या दुप्पट कोण्याचा वेग मात्र भारतापेक्षाही कमी आहे. केवळ रुग्णसंख्या दुप्पट होण्याचाच दर नव्हे तर त्या दरम्यानचा मृत्युदरही भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.

देशभरात १०७५ जणांचा बळी

करोनामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाल्याने देशभरातील करोनाबळींची संख्या १०७५ इतकी झाली आहे. तर १८२३ नवे रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या ३३,६१० इतकी झाली आहे. एकूण ८,३७२ रुग्ण बरे झाले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी २४.९० इतकी आहे.

अमेरिकेतील करोनाबळींची संख्या ६० हजारांपलीकडे

वॉशिंग्टन : अमेरिकेतील करोनाबळींची संख्या गुरुवारी ६० हजारांपलीकडे पोहचली. ही संख्या आणखी वाढणार हे निश्चित आहे. देशातील करोनाबळींची एकूण संख्या ६० हजारांपर्यंत राहू शकेल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काही दिवसांत सांगितले होते. अमेरिकेत करोनामुळे १ लाख ते २.४० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकेल, असा इशारा व्हाइट हाऊसने पूर्वी दिला होता. त्याच्या तुलनेत अमेरिका करोनाविरोधी उपाययोजनेत यश मिळवेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. आम्ही उपाय योजले नसते, तर २.२ दशलक्ष अमेरिकी लोक मरण पावले असते, अशी बढाईही त्यांनी मारली होती.

२० वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात ५८ हजार २२० अमेरिकी सैनिक मरण पावले होते. तो आकडा अमेरिकेने बुधवारी पार केला. मात्र, १९१८ सालच्या फ्लूच्या महासाथीत अमेरिकेतील ६ लाख ७५ हजार लोक मृत्युमुखी पडले होते, त्यापेक्षा हा आकडा बराच कमी आहे.