जम्मू-काश्मीरमध्ये येत्या ८ ऑक्टोंबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी खळबळजनक विधान केलं आहे. काश्मीरच्या बाबतीत भारताने चूका केल्या. या चूकांमुळे काश्मीर खोऱ्यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते असं वक्तव्य सत्य पाल मलिक यांनी केलं आहे.

काश्मीर खोऱ्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर आपला भर आहे. जेणेकरुन केंद्र सरकारला पुन्हा मुख्यप्रवाहातील पक्षांबरोबर चर्चा सुरु करता येईल. पाकिस्तानच्या सहभागाची अट ठेवली नाही तर हुरियतही या चर्चेत सहभागी होऊ शकतो असे सत्य पाल मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात येत्या आठ ऑक्टोंबरपासून पंचायत निवडणूकांना सुरुवात होणार आहे. दहशतवादी संघटनांनी या निवडणूका घेऊ नयेत अशी धमकी दिली आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काश्मीरमधील प्रमुख पक्षांनी या निवडणूकांवर बहिष्कार घातला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सत्य पाल मलिक यांनी पदभार स्वीकारला. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले कि, भारताने काश्मीरचा प्रदेश जबरदस्तीने व्यापलेला नाही. स्वत:च्या इच्छेने काश्मीर भारताबरोबर आला आहे. त्याला भारतव्याप्त काश्मीर म्हणता येणार नाही. कोणी याला व्यापून टाकणे म्हणत असेल तर तो वेगळा विषय आहे. असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काश्मीरच्या बाबतीत काही चूका झाल्या हे तुम्ही म्हणू शकता. या चूका अशाच सुरु राहिल्या तर काश्मीर खोऱ्यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते असे सत्य पाल मलिक म्हणाले.

जे काही घडले त्यामुळे भारताने काश्मीर व्यापलाय अशी प्रतिमा तयार केली गेली आहे. पण भारताने काश्मीर व्यापलेला नाही. ते स्वच्छेने भारतासोबत आले आहेत असे मलिक म्हणाले. कलम ३७० आणि ३५ अ संदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले कि, मी निवडून आलेलो लोकप्रतिनिधी नाहीय पण निवडून आलेले सरकार सत्तेवर येईपर्यंत कलम ३५ अ संदर्भातील सुनावणी स्थगित करावी असे माझे मत आहे. हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्येही तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही. हा कुठला मोठा गुन्हा आहे का? राजकीय कारणांसाठी असे वाद निर्माण केले जातात असे ते म्हणाले.