13 November 2019

News Flash

भारतात नोकऱ्यांची नाही, कमी पगाराची समस्या : मोहनदास पै

सीएमआयईच्या बेरोजगारीच्या आकड्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टी. व्ही. मोहनदास पै

भारतात नोकऱ्यांची नाही तर कमी पगाराची समस्या असल्याचे महत्वपूर्ण मत इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि दिग्गज गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी नोंदवले आहे. भारतात कमी पगाराच्या संधी निर्माण होत आहे मात्र, अशा नोकऱ्या स्विकारण्यास पदवीधारक इच्छुक नाहीत. दरम्यान, त्यांनी बेरोजगारीच्या आकड्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

पै म्हणाले, भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण होताना दिसत नाहीत. तर १० ते १५ हजार रुपयांच्या नोकऱ्या अधिक आहेत. या नोकऱ्यांकडे पदवीधर आकर्षित होत नाहीत. त्यामुळे भारतात कमी पगाराची समस्या आहे, कामाची नाही. त्याचबरोबर भारतात प्रांतीक आणि भौगोलिक समस्याही खूप आहेत, त्याचाही परिणाम रोजगारावर होत आहे.

पै यांनी धोरणकर्त्यांना एक सल्लाही दिला आहे. ते म्हणतात, भारताने चीनप्रमाणे मनुष्यबळावर आधारीत उद्योग सुरु केले पाहिजेत. तसेच बंदरांच्या जवळ पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. नोकरी करणाऱ्यांच्या इच्छापूर्तीसाठी हायटेक संसोधन आणि विकास क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. आपल्याकडे योग्य धोरणांचा अभाव असल्याने अधिक मनुष्यबळाचा वापर आपण करु शकत नाही.

बेरोजगारीचे आकडे चुकीचे

सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीद्वारे (सीएमआयई) बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये १.१० कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, हे चुकीचे असल्याचे पै यांनी म्हटले आहे. १५-२९ वर्षे वयोगटात बेरोजगारीच्या केलेल्या सर्वेक्षणात चुका आहेत. उलट रोजगारावरील सर्वात योग्य आकडेवारी ईपीएफओची आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, संगठीत क्षेत्रातील ६० ते ७० लाख लोकांना प्रत्येक वर्षी रोजगार मिळाला आहे.

First Published on June 16, 2019 7:38 pm

Web Title: india has problem with low salary not jobs says tv mohandas pai aau 85