न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी मिळावी यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती केली आहे. मात्र, सध्या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या विनंतीवर सल्लामसलत करुन निर्णय घेण्यात येईल, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी माध्यमांतील वृत्ताच्या हवाल्याने एएनआयने याबाबत ट्विट केले आहे. तसेच पाकिस्तानने भारताच्या विनंतीवर तत्काळ उत्तर दिले नसल्याने भारत सरकारने यावर अद्याप कोणतीही टिपण्णी केलेली नाही.

यापूर्वी पाकिस्तानने जून महिन्यात एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात जाण्याासाठी पंतप्रधान मोदींच्या विमानाला परवानगी दिली होती. यावेळी देखील भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी मागितली होती.

दरम्यान, मधल्या काळात भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील परस्पर राजकीय संबंध तणावाचे बनले आहेत. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आईसलँड दौऱ्यासाठी जाणाऱ्या विमानाला पाकिस्तानने परवानगी नाकारली होती.