भारताने आता करोनाच्या लस उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक नागरिकासाठी या लशीचा खर्च ६ ते ७ डॉलर म्हणजेच ५०० रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे सरकारने १३० कोटी जनतेसाठी ७ बिलियन डॉलर म्हणजेच ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने ब्लुमबर्गच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून या निधीची तरतूद सध्याच्या वित्तीय वर्षाच्या शेवटी करण्यात येणार आहे. त्यामुळे ही तरतूद झाल्यानंतर करोनाच्या लस निर्मितीमध्ये निधी कमी पडणार नाही. सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक रामानन लक्ष्मीनारायण यांचं म्हणण आहे की, “भारत करोनाच्या लशीचा मोठा खरेदीदार असून विक्रेताही आहे. त्यामुळे लस निर्मितीची किंमत कमीही होऊ शकते.”

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी आहे. गेल्या काही दिवसांत या कंपनीचे सर्वोसर्वा अदर पूनावाला यांनी म्हटलं होतं की, “भारत सरकारला देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्यासाठी सुमारे ८०,००० कोटी रुपयांची गरज लागेल. लशीच्या खरेदीसह देशातील विविध भागात ती पोहोचवण्यासाठी हा खर्च लागणार आहे.”

सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या वैज्ञानिकांच्या एका समितीने दावा केला आहे की, “भारतात आता करोनाचा सर्वोच्च काळ ओसरला आहे. फेब्रुवारीपर्यंत देशात करोनाचं संक्रमण नियंत्रित होईल.” मात्र, या समितीने येत्या सणांच्या आणि हिवाळ्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे.