देशातील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र आणि राज्यातील सरकार चिंतेत आहेत. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहेत. विशेषत: परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे भारतात करोनाचा प्रसार झपाट्यानं झाल्यानं केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रानं जगभरातील ३६ देशांच्या नागरिकांना भारतबंदी केली आहे.

भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या बुधवारी १५४ झाली आहे. देशाच्या विविध भागात सतरा नवीन रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या रुग्णांमध्ये २५ परदेशी नागरिक असून आतापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

बळींची संख्या जास्त नसली तरी करोनाबाधितांचा आकडा मात्र, वाढू लागला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असून, देशात १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. ‘करोना’चा संसर्ग वाढत असल्यानं प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून केंद्र सरकारनं ३६ देशातील नागरिकांना काही काळासाठी प्रवेश बंदी केली आहे. या काळात हवाई वाहतूक करणाऱ्या कोणत्याही विमान कंपनीला बंदी घातलेल्या देशातून प्रवाशांना आणता येणार नाही. यातील ११ देशातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली.

या देशातील नागरिकांना प्रवेश बंदी –

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोशिया, सायरस, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलँड, हंगेरी, आर्यलंड, इटली, लॅटिव्हिआ, लिंचेस्टिंन, लिथुनिआ, लक्झबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, सोलव्हेनिआ, स्पेन, स्विडन, स्विझर्लंड, तुर्के, युके यासह ३६ देशातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. १२ मार्चच्या रात्रीपासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.