वॉशिंग्टन : भारताने गेली अनेक वर्षे चढे आयात कर लावले असून त्यामुळे अमेरिकेला व्यापारात त्याचा मोठा फटका बसला आहे याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे.

ट्रम्प यांची पहिली भारत भेट २४ व २५ फेब्रुवारी रोजी होणार असून ते त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या समवेत अहमदाबाद, आग्रा व नवी दिल्ली येथे भेट देणार आहेत. अमेरिकी उत्पादनांना फायदा व्हावा यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापार चर्चा करण्यात येईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

कोलोरॅडो येथील ‘कीप अमेरिका ग्रेट’ मेळाव्यात त्यांनी सांगितले की, मी पुढील आठवडय़ात भारतात जात आहे. त्यावेळी भारताशी व्यापारावर चर्चा होईल. त्यांनी आमच्या वस्तूंवर इतकी वर्षे बरेच कर लादले त्याचा आम्हाला व्यापारात आर्थिक फटका बसला आहे. मोदी मला खरोखर आवडतात, मी त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे.

या दौऱ्यात व्यापार करार होण्याची शक्यता फेटाळताना त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार करार होऊ शकतो हे खरे आहे पण तो आताच्या दौऱ्यात अवघड आहे. व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्या तरी जर अमेरिकेला फायदा होत नाही असे दिसले तर चर्चा पुढे जाणार नाही. निवडणुकीनंतर व्यापार करार होईल तेव्हा काय होते ते बघू या. अमेरिकेच्या फायद्याचा असेल तरच व्यापार करार केला जाईल. कुणाला आवडो न आवडो आमच्यासाठी अमेरिका प्रथम हे धोरण कायम आहे.

अमेरिकेच्या जगातील एकूण व्यापारापैकी तीन टक्के व्यापार भारताशी निगडित आहे.