संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत काश्मीर मुद्यावरुन भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला भारताने आज चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानात दहशतवाद्यांची भरभराट होते. ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्यांना संरक्षण मिळते. पाकिस्तानात दहशतवादी रस्त्यावर मोकळेपणाने फिरतात. त्यांना कायद्याचा कुठलाही धाक नाही. पाकिस्तान स्वत: एक अपयशी देश आहे त्यामुळे त्यांनी जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रातील भारताच्या दुसऱ्या सचिव मिनी देवी कुमाम यांनी पाकिस्तानला सुनावले.

२००८ मुंबई हल्ला, २०१६ पठाणकोट हल्ला आणि उरी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर पाकिस्तानी सरकार कधी कारवाई करणार? याची आम्ही वाट पाहत आहोत असे कुमाम म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे कायमस्वरुपी प्रतिनिधी ताहीर अंद्राबी यांनी काल काश्मीर मुद्यावरुन भारतावर टीका केली होती. पाकिस्तानी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सतत जम्मू-काश्मीरच्या ठरावाचा विषय उचलून धरतो. पण त्याच ठरावानुसार पाकिस्तानने प्रथम बेकायदापणे बळकावलेला काश्मीरचा भाग सोडला पाहिजे पण पाकिस्तानला याचा सोयीस्कर विसर पडतो असे कुमाम म्हणाल्या.

पाकिस्तान नेहमीच भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत आला आहे असे कुमाम म्हणाल्या. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी ठरवलेला हाफिझ सईद आज खुलेआम पाकिस्तानात फिरत आहे. हे संयुक्त राष्ट्राचे उल्लंघन आहे असेही कुमाम यांनी म्हटले आहे.