26 February 2021

News Flash

सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे पाकिस्तानने मान्य करावे

भारत आणि पाकिस्तानातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले

| August 27, 2016 01:47 am

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रविवारी रात्री श्रीनगरपासून ५४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ४६ राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळावर हल्ला चढवला

परराष्ट्र सचिवांचे पाकच्या निमंत्रणाला उत्तर

भारत आणि पाकिस्तानातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले असून, सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याबद्दल पाकिस्तानने नकाराच्या भूमिकेत (डिनायल मोड) राहू नये, असे भारताने शुक्रवारी त्या देशाला सुनावले.

काश्मीरच्या मुद्दय़ावरील बोलण्यांसाठी नव्याने निमंत्रण देणाऱ्या पाकिस्तानी परराष्ट्र सचिव एजाझ अहमद चौधरी यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबादने पाकव्याप्त काश्मीरवर केलेला बेकायदेशीर ताबा लवकरात लवकर सोडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. पाकिस्तान हाच दहशतवादाचा ‘प्रमुख अपराधी’ असल्याची केवळ भारतालाच नव्हे, तर या संपूर्ण भागाला कल्पना आहे, असेही जयशंकर यांनी सुनावले आहे.

सीमापारचा दहशतवाद संपवणे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणे पाकिस्तानने थांबवावे, या अजेंडय़ासह भारत पाकिस्तानशी ज्यातून काही निष्पन्न होईल अशी बोलणी करू इच्छितो ही गोष्ट परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केली असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.वरील मुद्दय़ांवर दोघांच्याही सोयीच्या कुठल्याही वेळी बोलणी करण्यास आपण तयार असल्याचे सांगतानाच, दहशतवादाचे समर्थन करणे आणि भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणे या बाबी परिणामकारक संवादासाठी प्रामाणिक आधार होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

सध्या इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या ‘सार्क’ देशांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेत भारताचे मंत्री गैरहजर असणे हे दोन्ही देशांच्या ताणलेल्या संबंधांचे निदर्शक आहे काय असे विचारले असता स्वरूप म्हणाले, की दहशतवाद्यांना पाठिंबा व आश्रय देणे, तसेच चांगले आणि वाईट दहशतवादी असा भेद करणे यामुळे या भागातील शांतता व स्थैर्याला फार मोठा धोका निर्माण झाला आहे.

पाकिस्तानने वस्तुस्थिती मान्य करावी आणि सीमेपलीकडच्या दहशतवादाबाबत नकारघंटा वाजवू नये, हे द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाचे आहे. जितक्या लवकर पाकिस्तान ही महत्त्वाची वस्तुस्थिती मान्य करेल, तितक्या लवकर दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, असे स्वरूप म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:47 am

Web Title: india hits out at pakistan for terrorism
Next Stories
1 ‘जीवसृष्टीसाठी ग्रह गोल्डीलॉकमध्ये असणे हा एकच निकष नाही’
2 पेट्रोल, डिझेल भेसळ रोखण्यासाठी उपायांवर अहवाल देण्याचा आदेश
3 ९० हजार टन डाळींची आयात
Just Now!
X