• ‘‘उरीचा हल्ला म्हणजे उंटावरची काडी होती.. तो झाल्या झाल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोमन ठरविले होते, की बस्स.. म्हणजे बस्स! त्यामुळेच हल्लय़ाच्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या बैठकीमध्येच त्यांनी लष्कराला सीमापार घुसण्यासाठी हिरवा कंदील दाखविला होता. माध्यमांनी जर संयम बाळगला असता तर ही कारवाई कदाचित यापूर्वीच झाली असती..’’
  • संरक्षण खात्यातील अत्यंत विश्वसनीय व्यक्ती माहिती देत होते. उरीचा जिव्हारी लागलेला हल्ला ते बुधवार रात्री व गुरुवारी पहाटे घेतलेला ‘बदला’ याचा बहुतांश अधिकृत तपशील (अतिगोपनीय माहितीवगळता) त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितला.
  • ते म्हणाले, ‘‘आम्हाला युद्ध नको होते; पण पाकला जरब बसविण्यासारखी कारवाई करावयाची होती. निर्णय पक्का होता. भूमिका स्पष्ट होती. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ (लाँचिंग पॅड) उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला तत्त्वत: मान्यता दिली गेली. त्यानुसार लष्कर, गुप्तचर विभागाचे काम चालू झाले. चार ठिकाणच्या सात तळांवर आम्ही लक्ष केंद्रित केले. विश्वसार्ह माहिती मिळाली तेव्हा लष्कराला सीमापार कारवाईसाठी तातडीने राजकीय हिरवा कंदील दाखविण्यात आला.
  • ही कारवाई रात्री साडेबाराच्या सुमारास चालू झाली. सुमारे अडीचशे किलोमीटर परिसरात पसरलेल्या पाच सेक्टरमधील सात दहशतवादी तळांची अचूक माहिती होती. हे तळ नियंत्रण रेषेपासून पाचशे मीटर ते तीन किलोमीटरच्या अंतरावर होते आणि कारवाईचा एकूण परिसर सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटरपर्यंतचा पसरला होता. निवडलेली वेळही अचूक होती. घनदाट अंधार. त्याचा अचूक फायदा घेण्यात आला.
  • विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सुपर कंमाडोजची पाच पथकांमध्ये (‘क्रॅक टीम्स’) विभागणी करण्यात आली होती. या पथकांमध्ये सुसज्ज असलेले २५ कमांडोज होते. साडेबारा वाजता कारवाई सुरू झाली. भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा या चार ठिकाणी हेलिकॉप्टरमधून ही पथके उतरली. ती उतरताना खरा धोका होता, पण त्यावर मात केली आणि पाहता पाहता सारे तळ दारूगोळ्यांच्या असंख्य फैरींनी उद्ध्वस्त करून टाकले. दहशतवाद्यांच्या मृतदेहांची किंवा आपला जवान शहीद झाला तरी मागे वळून पाहायचे नाही, अशा सक्त सूचनाच या सुपर कमांडोजना दिल्या गेल्या होत्या.
  • उरीनंतर पेटून लगेच हल्ला करता आला असता. तेवढी सज्जता लष्कराची होती; पण पाक सावध होता. त्याचवेळी माध्यमांमध्ये अतिरंजित वार्ताकन येत होते. त्यामुळे आम्हाला थोडे थांबावे लागले आणि अचूक तयारीसाठी वेळही मिळाला. पण पाकला वाटले की आम्ही थंडावलो. ते थोडे बेसावध राहिले. हल्ला करण्यापूर्वी आम्ही नियंत्रण रेषेवर अन्य काही ठिकाणी फैरी चालविल्या. ते जसे दहशतवाद्यांना घुसविण्यापूर्वी ‘कव्हर फायरिंग’ करतात, तसा चकमा यावेळी आम्ही त्यांना दिला. आपली कारवाई इतकी अचूक, दर्जेदार आणि वेगवान होती, की तिचा आवाका अवाढव्य असतानाही आपली प्राणहानी झाली नाही. पहाटे साडेचार वाजता ही पथके सुखरूप परतली. पाकनेही प्रतिकार केला; पण तो खूप तोकडा होता. त्यानंतर आमच्या लष्करी कारवाईच्या महासंचालकांनी पाकिस्तानच्या महासंचालकांना अधिकृत माहिती दिली आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला सविस्तर माहिती दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

देशाबाहेर भारतीय सैन्य दलाची कारवाई

  • बांग्लादेश युध्दात पूर्व पाकिस्तानातील चढाई
  • श्रीलंकेत लिट्टे दहशतवादी संघटनेविरुध्द अनेक मोहिमा
  • मालदिव व माले येथे ‘ऑपरेशन कॅक्टस्’,
  • म्यानमारमधील उल्फाच्या तळांवरील कारवाई
  • पाकिस्तान हद्दीतील कारवाई