भारतात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. सध्याचे दोन्ही देशांचे संबंध लक्षात घेता इम्रान खान या बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल साशंकता आहे. वर्षअखेरीस भारतात ही एससीओची बैठक होत आहे.

पुलवामा, काश्मीर या मुद्दांवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने थेट बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तानची फायटर विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

संसदेने ऑगस्ट महिन्यात काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात मोहिमच उघडली आहे. पाकिस्तानकडून भारताला अनेकदा युद्धाचे इशारे देण्यात आले आहेत. सध्या दोन्ही बाजूंकडून होणारी शाब्दीक लढाई थांबली असली तरी, सीमेवर धुमश्चक्री कायम आहे.

सीमेवरील पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला भारतीय सैन्याकडून तितकेच चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान भारतात येण्याची शक्यता धुसर वाटते. त्यांच्याजागी ते पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधीला पाठवू शकतात. सरकारच्या प्रमुखांसाठी असलेल्या एससीओ हेडसच्या बैठकीला काही देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहिल्याची सुद्धा उदहारणे आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्याजागी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सुद्धा या बैठकीला येऊ शकतात.

काय आहे SCO
‘एससीओ’ म्हणजे ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’, अर्थात शांघाय सहकार्य संघटना. चीनसह रशिया, भारत, पाकिस्तान तसेच कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे रशियालगतचे देश या संघटनेचे सदस्य आहेत. ‘एससीओ’मध्ये भारत व पाकिस्तान हे एकाच वेळी, २०१७ साली अस्ताना येथे झालेल्या शिखर बैठकीपासून समाविष्ट झाले.