जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीतील निष्कर्ष

कोणता देश सर्वात जास्त उत्साही आणि कार्यक्षम आहे आणि कोणता देश सर्वात आळशी आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांमध्ये पाहणी करून वर्गवारी केली आहे. सर्वात जास्त कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा देशाने पहिले स्थान पटकावले आहे तर यादीत तळाला म्हणजे सर्वात आळशी या स्थानावर कुवेत देश आहे. उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७ व्या स्थानावर आहे.

उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका १४३ व्या स्थानावर, इंग्लंड १२३ व्या स्थानावर, सिंगापूर १२६ व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया ९७ व्या स्थानावर आहे. कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया आणि इराकमधील निम्म्याहून जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. तर युगांडामधील केवळ ५.५ टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाही आहे.

उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७ व्या स्थानावर असून फिलिपाइन्स १४१ व्या तर ब्राझील १६४ व्या स्थानावर आहे. दर आठवडय़ाला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असेल तर तो शरीरासाठी पुरेसा व्यायाम आहे, असा संघटनेचा निकष आहे.  बहुतेक सगळ्या देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा कमी शारीरिक मेहनत करीत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.

कामाचे बैठे स्वरूप आणि वाहनांवर असलेले अवलंबित्व यामुळे श्रीमंत देशांमधील नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांनी व्यायाम करावा, शारीरिक कष्टाचे प्रमाण वाढवावे यासाठी सर्व देशांनी मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.