पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भूतानचे पंतप्रधान लोतै शेरिंग यांची थिंपू येथे भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींना म्हटले की, भारतीयांच्या मनात भूतानचे अनोखे स्थान आहे. माझ्या मागील कार्यकाळातही माझ्या पहिल्या दौऱ्यासाठी मी भूतानची निवड केली होती. यंदा देखील माझ्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरूवातीस मी भूतानला आल्याने आनंदी आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, हे भारताचे भाग्य आहे की आम्ही भूतानच्या विकासातील प्रमुख भागीदार आहोत. भूतानच्या पंचवार्षिक योजनांमध्ये भारताचे सहकार्य आपल्या इच्छा आणि प्राथमिकतांच्या आधारे यापुढेही कायम राहील. तसेच, सार्क करन्सी स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत भूतानसाठी करन्सी स्वॅपची मर्यादा वाढवण्यासाठी आमची सकारत्मकता आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये ‘रूपे कार्ड’ देखील सादर केले. त्यांनी म्हटले की, मला अत्यंत आनंद होत आहे की, आज आम्ही भूतानमध्ये ‘रूपे कार्ड’ सादर केले. यामुळे डिजिटल देवाणघेवाण आणि व्यापार तसेच पर्यटन क्षेत्रातील आमचे संबंध अधिक बळकट होतील.

पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोतै शेरिंग यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ट्विटद्वारे म्हटले की, आमच्यातील घनिष्ठ संबंधामध्ये नवी उर्जा आणि विश्वास निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकाधिक वाढीबद्दल चर्चा करण्यात आली आहे. या अगोदर दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजधानी थिंपू येथे जंगी स्वागत करण्यात आले. तेथील नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहत एका हातात भारताचा तिरंगा ध्वज तर दुसऱ्या हातात भूतानचा ध्वज घेऊन मोदींचे स्वागत केले.