काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेण्याआधीच यात आता आणखी भर पडली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारत देश हा पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही, अशा शब्दांत चंद्रशेखर राव यांनी टीका केली आहे. ते तेलंगणातील संगारेड्डी येथील निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. भारत तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या मालकीचा आहे का ? ही लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेवर राहाल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तेलंगणातील आदिवासी आणि मुसलमानांसाठी आरक्षण वाढवून देण्यास परवानगी न दिल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी मोदींवर टीका केली. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याचा हवाला देत ते म्हणाले, मी केवळ हा प्रस्ताव देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. केंद्राला यापूर्वी यासंबंधी ३० पत्रेही लिहिली होती. मंत्र्यांनीही दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस केली होती. आता ते म्हणत आहेत की, ते हा प्रस्तावही मंजूर करणार नाहीत आणि दुसऱ्यालाही करु देणार नाही.

तेलंगणाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा बिगर भाजपा, बिगर काँग्रेसचे सरकार केंद्रात येईल, असेही राव यांनी म्हटले. यापूर्वीही काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आई-वडिलांचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. यावर पंतप्रधान यांनीही पलटवार केला होता.