ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला जवळजवळ ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्न आज भंग पावलं. चार दशकांपासून सुरु असणारा ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पदरी आज निराशाच पडली. विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा ५-२ च्या फरकाने पराभव झाला आणि भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोक्यो ऑलिम्पिकमधील ही ड्रीम रन संपुष्टात आली. पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. मात्र या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पराभूत झालेल्या भारतीय संघाला एक विशेष संदेश दिलाय.

नक्की वाचा >> हॅटट्रीक, पेनल्टीजचा पाऊस अन्… सामन्यात काय काय घडलं पाहा स्कोअकार्ड

“जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा भाग आहे. आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि तेच फार महत्वाचं आहे. पुढील सामन्यासाठी तसेच भविष्यातील वाटचालीसाठी मी संघाला शुभेच्छा देतो. भारताला या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे,” असं ट्विट सामना संपल्यानंतर मोदींनी केलं आहे.

मोदी पाहत होते सामना…

कोट्यावधी भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज सकाळपासून हा सामना लाइव्ह पाहत होते. सकाळी सात वाजता सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या हाफनंतर दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीत होते. मोदींनी पहिल्या क्वार्टरचा खेळ संपल्यानंतर सात वाजून ३७ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये मोदींनी, “मी भारत विरुद्ध बेल्जियमदरम्यानचा पुरुष हॉकीचा उपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. मला आपल्या संघाचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं.

हाफ टाइमनंतर भारताने समान्यावरील पकड गमावली…

पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत २-० ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले.

पेनल्टीचा पाऊस…

बेल्जियमकडून अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅटट्रीक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचं सोनं करत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने ५-२ ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळालं होतं.