सीमेपलीकडील दहशतवादासारखी सीमेपलीकडील प्रदूषण ही नवी संकल्पना पाकिस्तानने जन्माला घातली आहे. तसेच याला पाकने भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने शुक्रवारी भारतावर धुराचे आक्रमण केल्याचा आरोप केला. भारतातील पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याबरोबरच येथील औष्णिक वीज प्रकल्पांमुळे सीमेलगतच्या पाकिस्तानी नागरिकांना धुराचा त्रास होत असल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानातील इंग्रजी दैनिक ‘डॉन’मध्ये यासंदर्भात वृत्त आले आहे. यावृत्तानुसार, पंजाब प्रांतात सीमेपलीकडून भारतातून होत असलेल्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे म्हटले आहे. लाहोरमध्ये देखील प्रदूषणाची उच्च पातळी असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे.
येथील पर्यावरण संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाहोरमध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, धुरक्याचा जाडसा थर इथल्या वातावरणात दिसून येत आहे. पिकांचे अवशेष जाळल्याने निर्माण झालेला धूर आणि राख याला कारणीभूत असल्याचे या विभागाने म्हटले आहे. हे प्रदूषण भारतातील पंजाब राज्यातून होत असल्याचा दावाही या पर्यावरण विभागाने केला आहे.

त्याचबरोबर, सहिवाल येथील कोळसा ऊर्जा प्रकल्पामुळे देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात भर पडत असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारचे चार ऊर्जा प्रकल्प हे भारतातील पंजाब राज्यात असून, ९ प्रकल्प हे राजस्थानमध्ये आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांत भारतातील या प्रकल्पांमुळे आणि पिकांचे अवशेष जाळण्यामुळे प्रदूषणाची पातळी गंभीर बनल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.