भारत हा जगभरातल्या देशांमध्ये वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो आहे. एक था टायगरपासून टायगर जिंदा है पर्यंतचा व्याघ्र संवर्धनाचा प्रवास हा निश्चितच समाधानकारक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वाघांची संख्या वाढली असली तरीही त्यांच्या मृत्यूंबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अखिल भारतीय व्याघ्र गणना २०१८चा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधान म्हणाले, वाघांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्ती झाली आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या व्याघ्र गणनेचा निकाल हा प्रत्येक भारतीयाला आनंद देणारा असाच आहे.  वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. तरीही देशातली वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे असे मोदींनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले, २०१४मध्ये भारतात वाघांसाठी संरक्षित प्रकल्पांची संख्या ६९२ इतकी होती. ती २०१९ मध्ये ८६० पेक्षा अधिक झाली आहे. त्याचबरोबर कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही २०१४ मध्ये असलेल्या ४३ वरुन शंभराहून अधिक झाली आहे. त्यामुळे मी या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या लोकांना हेच सांगेन की ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, हा प्रवास थांबता कामा नये. व्याघ्र संवर्धनाशी जोडलेले जे प्रयत्न आहेत त्यांचा अधिक विस्तार व्हायला हवा तसेच त्यांचा वेग अधिक वाढायला हवा, अशी अपेक्षा यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली.

व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो.