इस्रायली उद्योगांनी भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा, असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. भारत व इस्रायल या देशांमधील सहकार्य अंतर्गत सुरक्षा, नवप्रवर्तन व विज्ञान तंत्रज्ञानात वाढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वराज यांनी भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सांगितले की, दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान बिन्यामीन नेत्यानाहू यांच्याच शब्दांत सांगायचे तर, भारत व इस्रायल यांच्यात सहकार्याच्या अमर्याद संधी आहेत. या दोन्ही देशांनी अंतर्गत सुरक्षा, नवप्रवर्तन, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवले आहे. नवीन भागीदारीच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत व दोन्ही देशातील ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थांच्या क्षमतांचा वापर झाला पाहिजे.

श्रीमती स्वराज पहिल्यांदाच पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी इस्रायली नेत्यांशी चर्चा केली. त्यात द्विपक्षीय संबंध व प्रादेशिक विषयांचा समावेश होता.

द्विपक्षीय संबंधात आर्थिक भागीदारीचे महत्त्व असून व्यापार सहकार्यही वृद्धिंगत करावे लागेल. ‘मेक इन इंडिया’ हा आमचा अग्रक्रम आहे, क्लीन गंगा, स्मार्ट सिटीज, डिजिटल इंडिया  या योजना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यात इस्रायली तज्ज्ञांच्या सहकार्याची गरज आहे.

अध्यक्ष रिवेन रिवलिन व पंतप्रधान बिन्यामीन नेत्यानाहू यांच्याशी आपली चांगली चर्चा झाली. इस्रायल व भारत यांच्यातील संबंधांचे महत्त्व या वेळी अधोरेखित झाले.

पुढील वर्षी भारत व इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. भारताने ज्यू लोकांना गेली अनेक शतके सुरक्षित निवारा दिला आहे, असे स्वराज यांनी सांगितले.