इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिंकासाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. ट्रॅव्हल अॅडव्हायजरी म्हणजे प्रवासासंबंधी देण्यात येणारी सूचना. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना शक्य असल्यास इराक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यकता नसल्यास इराकला जाण्याचे टाळा असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

असा सल्ला का दिला?
शुक्रवारी पहाटे अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला. त्यानंतर सूड घेण्याच्याच इराद्यानेच इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. दोन्ही देशांमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खबरदारी म्हणून आपल्या नागरिकांना इराक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय.

पुढील सूचनामिळेपर्यंत गरज नसल्यास इराकचा प्रवास टाळा तसेच इराकमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांना सर्तक राहण्याच्या आणि अंतर्गत प्रवास टाळण्याची सूचना देण्यात आली आहे. “इराकमध्ये वास्तव्याला असणाऱ्या भारतीयांना सर्व सुविधा देण्यासाठी बगदाद आणि एर्बिल या दोन शहरातील आमच्या दूतावासत कामकाज सुरळीत सुरु राहिल” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले.

विमान कंपन्यांना उड्डाण टाळण्याचा सल्ला ?

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय विमान कंपन्यांना इराक, इराण आणि आखातमधून उड्डाण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याआधी अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल एव्हिएशनने ताजा निर्णय घेण्याआधीच अमेरिकन प्रवासी विमान कंपन्यांना इराक, इराण, ओमान या भागातून २६ हजारफुटापेक्षा कमी उंचीवरुन उड्डाण करण्यास मनाई केली होती. जूनमध्ये इराणने अमेरिकेचे टेहळणी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

अणुऊर्जा केंद्राजवळ शक्तिशाली भूकंप
इराणच्या बुशहर शहरात बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.५० वाजता शक्तीशाली भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची ४.९ इतकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे इराणच्या अणुऊर्जा केंद्राजवळच हा भूकंप झाला आहे. कामकाज सुरळीत सुरु राहिल.