अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांना व्यूहात्मक रचनेसाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येणार आहे. चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.

भारत आणि जपान यांच्या सशस्त्र दलांमध्ये एकमेकांना मदत आणि सेवा देण्याची तरतूद असलेला करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे. संरक्षण सचिव अजयकु मार आणि जपानचे राजदूत सुझुकी सातोशी यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी एकमेकांच्या सुविधांचा वापर करणे, एकमेकांना सहकार्य करणे आदी मुद्दय़ांचा करारामध्ये समावेश आहे.

पंतप्रधान मोदी – शिंजो अबे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि कराराचे स्वागत केले. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिक दृढ होईल आणि प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेत त्याचा सहभाग असेल, असे दोन्ही नेते या वेळी म्हणाले.