17 January 2021

News Flash

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याची कबुली

अखेर सत्य समोर आलं....

(Source: AP/PTI Photo/File)

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी मारले गेले. पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही.

२६ फेब्रुवारी २०१९ ला भारताने केलेल्या या स्ट्राइकमध्ये काहीही जीवितहानी झाली नाही असे पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने एअर स्ट्राइकमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे.

आगा हिलाली या पाकिस्ताच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने, टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती.

“भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धाची कृती केली. ज्यात ३०० जण ठार झाले. त्यांच्या लक्ष्यापेक्षा आपले लक्ष्य वेगळे होते. आपण त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य केले” पाकिस्तानी उर्दू चॅनलवर बोलताना आगा हिलाली यांनी हे सांगितले.

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं होतं. पण त्याचे ठोस पुरावे न दिसल्यामुळे अनेकांनी एअर स्ट्राइकच्या यशाबद्दल शंका घेतली होती. खरंतर बालाकोटमध्ये भारतीय फायटर विमानं आपल्या लक्ष्यापासून चुकण्याची शक्यता अत्यंत धुसर होती. कारण इंडियन एअर फोर्सने ‘स्पाइस २०००’ बॉम्बचा वापर केला होता.

स्पाइस २००० स्मार्ट बॉम्ब लक्ष्य कसे शोधून काढते ?
भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.

या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते.

पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते. फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 8:44 pm

Web Title: india killed over three hundread in balakot airstrikes claims former pakistani diplomat dmp 82
Next Stories
1 उड्डाणानंतर चार मिनिटात श्रीविजय एअरचे विमान बेपत्ता, समुद्रात कोसळल्याची भीती
2 भारतात करोना लसीकरणाची तारीख ठरली, केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा
3 लडाखच्या चुशूल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकाला पकडलं
Just Now!
X