चीनच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवता येणे भारतासाठी शक्य नाही. भारताकडे तेवढी ताकद नाही, असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, लडाखमधील काश्मीरचा भाग असलेला अक्साई चीनचा परिसर चीनच्या ताब्यात आहे. आपण त्यावरून केवळ आकांडतांडव करू शकतो, पण आपल्याकडे हा प्रदेश परत मिळवण्याची ताकद नाही. हा प्रश्न केवळ चीनशी मैत्री करूनच सोडवता येणे शक्य आहे, त्यावर युद्ध हा पर्याय नाही, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.

त्याऐवजी भारताने आपली राजनैतिक ताकद वाढवण्यावर भर द्यावा. या मार्गानेच हा प्रश्न सोडवता येणे शक्य आहे. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, असे आपण म्हणतो. मात्र, आपण कधीतरी चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले का? असे झाले असते तर चीनने पाकिस्तानशी मैत्री केलीच नसती, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला.

चीनला सध्या त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सील्क रूटसाठी काराकोरम बायपासची निर्मिती करायची आहे. सील्क रूटमुळे चीन बंदरांशी जोडला जाईल. हा रस्ता चीनव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. याशिवाय, दलाई लामा हा भारत आणि चीन यांच्यातील वादाचे आणखी एक कारण आहे. दलाई लामा यांना भारतामध्ये आश्रय मिळू नये, यासाठी चीन प्रयत्नशील आहे. मात्र, एखाद्याला आसरा कसा द्यायचा, हे भारताला व्यवस्थितपणे माहिती आहे. एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे देशातून हुसकावता येणार नाही, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

भारतातील परकीय गुंतवणुकीवर चीननं शांत राहावं; चिनी माध्यमांचा सरकारला घरचा आहेर

भारत आणि चीनमधील संबंध सध्या प्रचंड ताणलेले आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाममध्ये चीनकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. भारतीय सैन्याने चिनी सैन्याच्या रस्ते निर्मितीच्या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे सिक्किम सीमेवर दोन्ही देशांचे जवान आमनेसामने उभे ठाकले आहेत. भारताने सैन्य मागे घ्यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे इशारे वारंवार चीनकडून देण्यात आले आहेत. मात्र चीनच्या धमक्यांना किंमत न देता भारतीय सैन्य सिक्किममध्ये पाय रोवून उभे आहे.

डोकलामची डोकेदुखी