वॉशिंग्टन : भारत येत्या २०३० पर्यंत जगात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहील. अमेरिका व भारत हे दोन मोठे लोकशाही देश एकत्र आले तर बरेच काही करू शकतात, असे अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, २०३० पर्यंतच्या काळाचा विचार केला तर भारत जगात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असेल.

ते म्हणाले की, जगाचे नेतृत्व करणारा भारत माझ्या डोळ्यासमोर येतो. जास्त लोकसंख्या असलेला भारत हा असा देश राहील जेथे जास्त पदवीधर, जास्त प्रमाणात मध्यमवर्ग, सेल फोन उपलब्धता, इंटरनेट वापरकर्ते असतील. भारताचे लष्करही जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशात या सर्व गोष्टी आहेत. सुमारे ६० कोटी लोक २५ वयाच्या आतले आहेत, त्यामुळे मनुष्यबळ ही मोठी ताकद आहे. भारतात सध्या मोठय़ा प्रमाणावर विकास होत आहे. पुढील दशकात दोन लाख कोटी रुपये हे पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत. २०३० पर्यंत लागणाऱ्या बऱ्याच पायाभूत सुविधा या अजून उभ्या  रहायच्या आहेत. त्यामुळेच आजमितीस शंभर नवीन विमानतळांचे काम सुरू झाले आहे.

जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेच्या कार्यक्रमात भारतातील माजी राजदूत असलेले वर्मा बोलत होते. २०५० पर्यंत भारताला याचा  लाभ होत राहील. भारताचे स्थान भक्कम राहील असे त्यांनी ‘ड्रायव्हिंग शेअर्ड प्रॉपेन्सिटी  अ ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रायॉरिटी फॉर यूएस इंडिया टाइज’ या विषयावर बोलताना स्पष्ट केले.