ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळू शकते. यंत्रणांनी मागितलेला अतिरिक्त डाटा स्थानिक उत्पादकांनी सादर केला आहे. या घडामोडीशी संबंधित असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो.

ब्रिटनमधील औषध नियंत्रक ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या डाटाचे विश्लेषण करत आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पुढच्या महिन्यापासून भारताला आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण सुरु करायचे आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे. सिरमच्या बरोबरीने फायझर आणि भारत बायोटेकने लसीच्या आपातकालीन परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

मध्यम, अल्प उत्पन्न गटातील देश तसेच उष्ण वातावरणातील देशांसाठी ऑक्सफर्डची लस मोठी आस आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस स्वस्त आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानातही ही लस स्टोअर करता येऊ शकते. फायझरची लस स्टोअर करणे त्या तुलनेत एक मोठे आव्हान आहे. भारतात CDSCO ने नऊ डिसेंबरला, तीन कंपन्यांनी आपातकालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जाचा आढावा घेतला. सिरमसह अन्य दोन कंपन्यांकडून अतिरिक्त डाटा मागितला.सिरमने मागितलेला सर्व डाटा आता सादर केला आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी आहे.