काश्मीर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मध्यस्थी करायला सांगितली या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. भारताच्या निषेधानंतर अमेरिकेने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काश्मीर वाद भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले.भारताच्या धोरणानुसार काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. ट्रम्प यांचे विधान काश्मीर प्रश्नी भारताच्या भूमिकेला छेद देणारे आहे.

काश्मीर प्रश्नी मोदींनी आपल्याला मध्यस्थी करायला सांगितली हे ट्रम्प यांचे विधान भारताने लगेच फेटाळून लावले. भारताने आता हा मुद्दा थेट व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित करुन आपला निषेध नोंदवला आहे असे इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विधानावरुन भारतीय राजकारणात गदारोळ सुरु झाला आहे.

दरम्यान अमेरिकन प्रशासनानेही डॅमेज कंट्रोलसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काश्मीर वाद भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे आम्ही नेहमीच मानले आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जी २० परिषदेच्यावेळी ओसाकामध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे काश्मीर प्रश्नी मदत मागितली होती असे विधान केले. ट्रम्प यांच्या या विधानावरुन भारतीय राजकारणात गदारोळ सुरु झाला आहे.