भारत व मलेशिया यांनी संयुक्तपणे दहशतवादाचा मुकाबला करण्याचा निर्धार केला असून संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचे ठरवले आहे. सर्व देशांनी दहशतवादी कारवायात सामील असलेल्यांना शिक्षा करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नजीब रझाक यांच्याशी चर्चेत व्यक्त केले.
चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी सांगितले की, विविध देशात दहशतवादी हल्ले चालू आहेत. अफगाणिस्तान व भारत या देशांमध्येही हल्ल्यांचा धोका आहे. मोदी यांनी दहशतवाद व मूलतत्त्वादाचा मुकाबला करण्यासाठी नजीब करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. दहशतवाद व धर्म यांचा संबंध नाही, इस्लाममधील खरी मूल्ये वेगळी आहेत.
संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, दोन्ही देश सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करीत आहेत व दहशवाद्यांना न्यायिक मार्गाने शिक्षा केली पाहिजे असे आमचे मत आहे. दोन्ही देशात दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य राहील. मलेशिया व भारत यांनी पारंपरिक व अपारंपरिक धोक्यांबाबत एकमेकांना माहिती देण्याचे मान्य केले.
संरक्षण व सुरक्षा सहकार्याबाबत मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी आपत्ती निवारणात व सागरी सुरक्षेत एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
सायबर सुरक्षेत आम्ही एकमेकांना सहकार्य करून दोन्ही देशात संयुक्त लष्करी कवायती होतील व दोन्ही देशांचा एसयू ३० मंच स्थापन केला जाईल. भारतीय कंपन्यांचे मलेशियातील अस्तित्व मोठय़ा प्रमाणात आहे, मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत आणखी वाटा उचलण्याची आमची तयारी आहे. मलेशियाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी भारतात यावे, असे सांगून मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशातील पदव्यांना त्यासाठी मान्यता देणे आवश्यक आहे. भारतातील अनेक उच्च शिक्षण संस्थांच्या पदव्या मलेशियात मान्य केलेल्या नाहीत. ब्रिक्सफिल्ड येथे लिटल इंडिया भागाच्या ‘तोरणा गेट’ या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले.