जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. १७ वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे.

चीनमधील सान्या येथे शनिवारी मिस वर्ल्ड २०१७ ही स्पर्धा रंगली. जगभरातून आलेल्या १३० सौंदर्यवतींमध्ये रंगलेली कांटे की टक्कर, ग्लॅमर- फॅशनच्या दुनियेतील तारे आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम अशा वातावरणात हा सोहळा पार पडला. अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले. प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तराला सर्वांनीच दाद दिली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली,  मी माझ्या आईच्या जवळ आहे. माझ्यामते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा, असे तिने सांगितले.

मानुषीच्या या उत्तराने परीक्षकांना प्रभावित केले. टॉप ३ मध्ये भारतासह इंग्लंड आणि मेक्सिकोच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले. त्यामुळे मिस वर्ल्डचा मुकूट कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली. मेक्सिकोची अँड्रीया मेझा सेकंड रनरअप तर इंग्लंडची स्टेफनी हिल फर्स्ट रनरअप ठरली. यानंतर मिस वर्ल्डच्या किताब मानुषी छिल्लरला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. प्रियंका चोप्रानंतर (२०००) भारताच्या सौंदर्यवतीला मिस वर्ल्डचा किताब मिळाला आहे.

मानुषी छिल्लर ही २१ वर्षांची असून ती मूळची हरयाणाची आहे. तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील इंग्रजी शाळेतून झाले. यानंतर सोनीपतमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून तिने पुढील शिक्षण घेतले. मानुषीचे आई-वडिल डॉक्टर असून अंतिम फेरीत मुलीला पाठिंबा देण्यासाठी छिल्लर कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.