अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने ५० हजार सैनिक सज्ज ठेवले आहेत. चीन दाखवत असलेल्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सुद्धा दौलत बेग ओल्डी येथे मिसाइल डागणाऱ्या T-90 रणगाड्यांची स्क्वाड्रन, सैन्य वाहने आणि चार हजार सैनिकांची तुकडी तैनात केली आहे. शक्सगाम-काराकोरम पास एक्सिसवरुन चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही तैनाती केली आहे. वरिष्ठ लष्करी कमांडर्सच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

काराकोरमच्या दक्षिणेला आणि चीप-चाप नदीच्या किनाऱ्याजवळ दौलत बेग ओल्डी येथे १६ हजार फूट उंचीवर भारताची शेवटची चौकी आहे. दारबूक-श्योक-डीबीओ रोडवरील काही पूल T-90 रणगाड्यांचा ४६ टन वजनाचा भार पेलू शकत नव्हते. त्यामुळे लष्कराच्या कमांडर्सनी विशेष उपकरणे वापरुन नदी, नाल्यांच्या वाटे हे रणगाडे दौलत बेग ओल्डीच्या शेवटच्या चौकीपर्यंत पोहोचवले आहेत.

गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी सैन्याबरोबर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारतीय लष्कराकडून सैन्य आणि रणगाडयांची तैनाती करण्यात आली आहे. पेट्रोलिंग पॉईंट १४,१५,१६,१७ आणि पँगाँग टीएसओमध्ये चीनने आक्रमकता दाखवल्यानंतर भारचीय लष्कराने सैनिकांना वाहून नेणाऱ्या गाडया, M 777 155mm हॉवित्झर्स, 130 mm बंदुका डीबीओमध्ये पाठवून दिल्या आहेत.

भारतीय लष्कर फक्त संख्येच्या दृष्टीने चीनच्या तोडीस तोड सैन्य तैनाती करत नाहीय, तर त्यांचे रणगाडे, एअर डिफेन्स, रडार्स आणि जमिनीवरुन हवेत डागली जाणारी मिसाइल यावरही बारीक लक्ष आहे. पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पण त्याचवेळी चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा तयार आहे.

भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० रणगाडे तैनात केले आहेत. भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव कमी करण्याची प्रक्रिया थांबली आहे. पँगाँग टीएसओ, डेपसांग या भागामधून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. तणावाची स्थिती कायम आहे.