पुढच्या महिन्यात सातवी चाचणी झाल्यानंतर ‘निर्भय’ सबसॉनिक क्रूझ मिसाइलचा औपचारिकरित्या भारतीय लष्कर आणि नौदलात समावेश होईल. पण त्याआधीच पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ भारताने ही मिसाइल्स तैनात केली आहेत. ‘निर्भय’ मिसाइलची रेंज १ हजार किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी या मिसाइलची निर्मिती केली आहे. हिंदुस्थान टाइम्सला हे वृत्त दिले.

काल जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ४०० किलोमीटर रेंज असलेल्या ‘ब्रह्मोस’ मिसाइलची चाचणी करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने निर्भय मिसाइलच्या औपचारिक समावेशाचा मार्ग मोकळा केला होता. लष्कराने नव्या मिसाइलच्या औपचारिक समावेशाची वाट न पाहता, एलएसीच्या सुरक्षेसाठी काही मिसाइल्स आधीच तैनात केली आहेत.

०.७ माच असा या मिसाइलचा वेग आहे. निर्भय क्षेपणास्त्र जमिनीपासून १०० मीटर ते चार किलोमीटर अंतरावरुन उड्डाण करुन लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र ३०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. लडाख सीमावादाला सुरुवात झाल्यापासून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दीर्घ पल्ल्याची सॅम क्षेपणास्त्र तिबेट आणि शिनजियांगमध्ये तैनात केली आहेत. परिस्थिती चिघळलीच तर चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सुद्धा सुपरसॉनिक ब्रह्मोस, सबसॉनिक निर्भय आणि आकाश क्षेपणास्त्राची तैनाती करुन ठेवली आहे.